बाळासाहेब शिंत्रे

🙏 आभार 🙏

हे लिखाण केवळ माझ्या एकट्याचे नाही. यामागे अनेकांची साथ, प्रेरणा, समीक्षा व सहकार्य आहे.

💐 विशेष आभार

श्री. प्रमोद कर्नाड

श्री. प्रमोद कर्नाड

अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्र. प्रस्तावना लेखन.

श्री. दिलीप जांभळे

श्री. दिलीप जांभळे

लेखक व निवेदक, प्लांट मॅनेजर, आरसीएफ (निवृत्त) मौलिक मार्गदर्शन

श्री. अविनाश कुलकर्णी

श्री. अविनाश कुलकर्णी

आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त (महाराष्ट्र शासन ) समुपदेशक अक्षर जुळणी

श्री. सर्जेराव कुईगडे

श्री. सर्जेराव कुईगडे

लेखक व संपादक जनरल मॅनेजर, स्टेट ट्रान्सपोर्ट बँक लि. समीक्षण व कौतुकाची थाप..

श्री. कृष्णा दावणे

श्री. कृष्णा दावणे

श्री कृष्णा दावणे, व्यंकटराव हायस्कूल कलाशिक्षक- मुखपृष्ठ सहाय्य.

श्री. विश्वास येजरे

श्री. विश्वास येजरे

आदर्श शिक्षक व ग्रामस्थ मुखपृष्ठ मदत व अक्षर जुळणी

श्री. डी.एन. दिवेकर

श्री. डी.एन. दिवेकर

उप महाप्रबंधक, आर.सी.एफ. (निवृत्त) प्रूफ रीडिंग.

उत्तम रेडेकर

उत्तम रेडेकर

उद्योगपती आणि गावातील युवा नेतृत्व. माझ्या गावात 'जीवन तरंग' पुस्तक वितरण सोहळ्याचे उत्तम आयोजन.

श्री. आनंद मुठे

श्री. आनंद मुठे

वेबसाइट प्रूफ रीडिंग.

श्री. अमोल शिंदे

श्री. अमोल शिंदे

वेबसाइट डिझायनिंग आणि डेव्हलपमेंट

नामोल्लेख नसलेल्या माझ्या सर्व सुहृदयांचेही शतशः आभार

परमेश्वराकडे एकच मागणं: हे प्रेम, आपुलकी, सहयोग निरंतर राहू दे.

- बाळासाहेब शिंत्रे

📢 पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी प्रास्ताविक

जीवन तरंग - पुस्तक प्रकाशन सोहळा

बाळासाहेब शिंत्रे यांचे प्रास्ताविक

आज माझ्या जीवन तरंग या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी उपस्थित ज्येष्ठ साहित्यिक व कवी सन्माननीय प्राध्यापक प्रवीण दवणे साहेब, शिवसेना उपनेते विजयजी नाहटा साहेब, जिल्हाप्रमुख विठ्ठलजी मोरे साहेब, ठाणे जिल्हा संपर्क संघटक श्रीमती संध्याताई वढावकर मॅडम, शिव सहकार सेनेच्या अध्यक्षा शिल्पाताई सरपोतदार मॅडम, आरसीएफच्या डायरेक्टर फायनान्स नजहत शेख मॅडम, प्रकाशक प्राध्यापक संतोष राणे साहेब, आर.सी.एफ. एक्स एम्प्लॉईज सोशल फोरमचे अध्यक्ष श्री. व्ही. डी. पाटील साहेब, नगरसेविका सौ. नेत्रा पाटील, श्री घाडगे साहेब व मान्यवर व्यासपीठ आणि माझ्या विनंतीला मान देऊन हजर असलेले पेद्रेवाडी ग्रामस्थ, आर.सी.एफ. मधील अधिकारी गण व कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, कोल्हापूरवासीय आणि बंधू-भगिनींनो आणि मित्रांनो!

कोरोनाचे निर्बंध असूनही आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या पुस्तक सोहळ्याला हजर राहिलात त्याबद्दल सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो.

कोरोनाच्या महामारीमुळे जो रिकामा वेळ मिळाला, त्यावेळी माझ्या जीवनातील आठवणी लिहायला चालू केल्या आणि त्यातून हे पुस्तक तयार झाले. ज्यांनी मला हे पुस्तक लिहिताना सहकार्य केले त्यांना मी धन्यवाद देतो.

माझं हे पुस्तक म्हणजे मी इथपर्यंत ज्यांच्यामुळे आलो, त्यांच्यासाठी वाहिलेलं हे 'एक भावरूपी शब्दपुष्प आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पेद्रेवाडी या छोट्याशा गावात व सर्वसामान्य कुटुंबात माझा जन्म झाला. माझं गाव गर्द वनराईने नटलेले आणि देवराईने घेरलेले असल्यामुळे सर्व ऋतुत आल्हाददायक आणि हवेहवेसे वाटणारे आहे अशा निसर्गरम्य गावात मला जन्माला येण्याचे भाग्य लाभले हे माझं नशीब समजतो. माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी म्हणजे खेड्यापाड्यात राहणाऱ्या सर्वच कुटुंबासारखी होती, मात्र आमच्या कुटुंबामध्ये जे प्रेम व जिव्हाळा मिळाला तो मात्र वेगळाच! अशा प्रेमळ कुटुंबात माझा जन्म झाला त्याबद्दल मी मला भाग्यवान समजतो.

त्यावेळेस गावातल्या सगळ्याच मुलांचं जास्तीत जास्त सातवीपर्यंत शिकायचं ध्येय असायचं. पण सातवी पर्यंत पण फार कमी मुलांना पोहचता यायचं. माझी परिस्थिती सातवीपर्यंत शिक्षण घेण्याची निश्चित नव्हती पण माझ्या नशिबानं साथ दिली आणि मी पदवीपर्यंत कसा पोहचलो ते मी माझ्या पुस्तकात लिहिलं आहे ते तुम्हाला कळेलच. त्यावेळी प्राथमिक शिक्षण घेताना परीट गुरुजींचा परिसस्पर्श झाला. अशा सर्व गुरुजणांना मी वंदन करतो. त्यानंतर सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या 'कमवा आणि शिका' या लेबर स्कीमच्या माध्यमातून माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर मी आरसीएफमध्ये 38 वर्षे नोकरी करून सिनियर फायनान्स मॅनेजर म्हणून निवृत्त झालो.

मी जी काही माझ्या जीवनात प्रगती केली आहे ती केवळ आरसीएफ कंपनीमुळेच! पेद्रेवाडी ते आर.सी.एफ. या प्रवासाचं खरं श्रेय मी माझ्या दोन्ही ज्येष्ठ बंधूना देतो.

आज माझ्या आयुष्याला जी स्थिरता लाभली आहे, ती फक्त माझी पत्नी रंजनाच्या मेहनतीने व कष्टाने साठवलेल्या प्रत्येक गोष्टींमुळेच. त्यात तिच्या काटकसरीचे कौतुक जेवढं करावं तितकं कमीच आहे. ती राजकारणात असूनही घरात येताना ती राजकारणाची चप्पल बाहेरच काढून येते आणि घरी गृहिणी म्हणून सर्व कामे करते. आयुष्याच्या या अवघड वाटेवर तिने दिलेल्या साथीमुळेच मी आयुष्याच्या ह्या सुखमय शिखरावर पोहचलो.

हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख मा.ना. श्री. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या प्रेरणेने आम्हाला शिवसेनेचे पाईक होण्याचं भाग्य लाभले.

आतापर्यंत आपण ऐकतो की आत्मचरित्र म्हटलं की ते एखाद्या असामान्य व्यक्तिमत्त्वाचं असतं, पण सर्वसामान्य व्यक्तींनी सुध्दा आपले आत्मचरित्र लिहावं अशी संकल्पना घेऊन या पुस्तकाचा जन्म झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आठवणींचा पेटारा उघडून बघावा आणि आपल्या मनाची बॅटरी चार्ज करावी असा एक नवीन पायंडा पाडण्याचा मी यातून प्रयत्न केला आहे.

या पुस्तकाचं मुद्रण माझ्या विद्यानगरीत म्हणजेच साताऱ्यात करण्याचा योग आला त्यामुळे या पुस्तकाला माझ्या दृष्टीने वेगळं महत्व प्राप्त झाले आहे. अजून एक विशेष बाब म्हणजे हे पुस्तक माझ्या कॉलेजच्या खास मित्राघ्या मुलाच्या प्रिटिंग प्रेसमध्ये छापलं गेलं आहे.

तसेच मी हे पुस्तक लिहिताना माझी पत्नी सौ रंजना, माझी मुलगी हर्षदा, मुलगा मिलिंद, सून रसिका, दुसरी सून प्रज्ञा या सर्वांनी मला प्रोत्साहन दिले. विशेष म्हणजे माझ्या पुस्तकाला पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांचा शब्दरूपी आशीर्वाद म्हणजे साक्षात सरस्वतीने माझ्या झोळीत टाकलेले अक्षरदानच होय आणि ते दोन शब्द म्हणजे माझ्यासाठी मिळालेला तो पुरस्कारच समजतो. त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यापेक्षा मला त्यांच्या ऋणातच राहणे पसंत करतो.

या सगळ्यांचा कळस म्हणजे आजच्या कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुणे लाभले ते साहित्यक्षेत्रात एका वेगळ्या उंचीवर आहेत, अशा ज्येष्ठ साहित्यिक व कवी प्रवीण दवणे यांच्या हस्ते माझ्या पुस्तकाचे प्रकाशन म्हणजे दुग्धशर्करा योगच आहे. यामुळे मी पुस्तक लिहिण्याचा जो घाट घातला त्याचं सार्थक झाल्याचं समाधान मला लाभलं.

म्हणून माझ्या आयुष्यातील १२ डिसेंबर २०२१ हा दिवस सुवर्णअक्षराने लिहिण्यासारखा आहे आणि तो माझ्या कायम लक्षात राहील.

माझे दोन शब्द संपवण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना एक विनंती करत आहे की हे पुस्तक आपण सर्वांनी जरूर वाचावे आणि वाचल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचाव्यात ही छोटीशी अपेक्षा व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

— बाळासाहेब वाकोजी शिंत्रे