बाळासाहेब शिंत्रे

थोडक्यात परिचय

बाळासाहेब वाकोजी शिंत्रे – वरिष्ठ वित्त व्यवस्थापक (निवृत्त), शिवसैनिक, लेखक

आम्ही उभयतांनी सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात विविध जबाबदाऱ्या पार पाडत समाजसेवेचा व संघटनात्मक कार्याचा प्रवास केला आहे. माझी पत्नी सौ. रंजना १९९५ साली नवी मुंबई महानगरपालिकेत प्रथम नगरसेविका म्हणून निवडून आल्यापासून हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या प्रेरणेने शिवसेनेच्या माध्यमातून नवी मुंबई तसेच कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहे. मी नोकरीत असतानाही विविध सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. निवृत्तीनंतर शिवसेनेच्या माध्यमातून अकोला विधानसभा मतदारसंघात संघटनात्मक बांधणीसाठी कार्यरत राहिलो असून, आजही विविध सामाजिक संस्थांमध्ये जबाबदारीची कामे पार पाडत आहे.

कोरोनाच्या बंदीवासाने मला संधी दिली – आणि 'जीवन तरंग' उमटले . आयुष्यातील सुख-दु:ख, यश-अपयश यांचे हे प्रतिबिंब आहे.

बाळासाहेब शिंत्रे

✅ यशस्वीपणे निभावलेल्या सामाजिक जबाबदाऱ्या

  • आर.सी.एफ. ऑफिसर्स असोसिएशन- सेंट्रल कमिटी- ५ वर्षे खजिनदार
  • आर.सी. एफ. रूरल स्पोर्ट्स क्लब- १५ वर्षे खजिनदार
  • कोल्हापूर जिल्हा उत्कर्ष संघ- १९९३ पासून १० वर्षे खजिनदार, त्यानंतर दीर्घकाळ कमिटी सदस्य.
  • कोल्हापूर जिल्हा शाहू विकास प्रतिष्ठान- सेंट्रल कमिटीत सक्रिय कार्य आणि २००९ मध्ये नवी मुंबई जिल्हा प्रमुख म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली.
  • पेद्रेवाडी ग्रामस्थ मंडळ- संस्थापक- १९९८ पासून अध्यक्ष (१५ वर्षे) आणि त्यानंतर ५ वर्षे कार्याध्यक्ष.
  • न्यु कृष्णा टाॅवर डी विंग कोपरखैरणे - सलग १३ वर्षे सेक्रेटरी.

🔶 वर्तमान सामाजिक जबाबदाऱ्या

  • श्रम साफल्य सहकारी पतसंस्था- संस्थापक- १९९८ पासून अध्यक्ष (१५ वर्षे), सध्या कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत
  • हिरण्यकेशी शिक्षण प्रसारक मंडळ- २५ वर्षापासून संचालक म्हणून कार्यरत
  • वैदिक विश्व (पब्लिक ट्रस्ट, वाशी सेक्टर १५) येथे ३० वर्षांपासून खजिनदार म्हणून कार्यरत
  • आर.सी.एफ. एक्स एम्प्लॉइज सोशल फोरम- माजी व्हाइस प्रेसिडेंट आणि सध्या कमिटी सदस्य म्हणून कार्यरत
  • १० वर्षांपासून शिवसेना अकोला (प) विधानसभा संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत
  • शिव सहकार सेना (महाराष्ट्र राज्य)- माजी नवी मुंबई जिल्हा संघटक. १० वर्षांपासून खजिनदार म्हणून कार्यरत
  • सी२ टाईप अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन. फाऊंडर कमिटी सदस्य १९८४ पासून- खजिनदार आणि कमिटी सदस्य २०१३ पर्यंत. सध्या असोसिएशन रूपांतरित शुभम को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी संस्थापक अध्यक्ष म्हणून ४ वर्षापासून कार्यरत

बालपण आणि शिक्षण

  • मी अवघा दोन वर्षांचा असताना वडिलांचे निधन झाल्याने कमी वयातच माझ्या ज्येष्ठ बंधूं बाबू दादा यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पेद्रेवाडी येथील श्री विठ्ठल विद्या मंदिरातून प्राथमिक शिक्षण पूर्ण.
  • आर्थिक अडचणींवर मात करत भादवण येथे हायस्कूलमध्ये प्रवेश. पावसाळ्यात नदी पार करण्याच्या अडचणीमुळे आजरा या तालुक्याच्या ठिकाणी नववीपासून माध्यमिक शिक्षण पूर्ण.
  • ज्येष्ठ बंधू अर्जुन दादांच्या पाठबळामुळे पुढील शिक्षणाची वाट खुली. ‘कमवा आणि शिका’ योजनेचा लाभ घेत डी. जी. कॉलेज ऑफ कॉमर्स, सातारा येथून पदवी संपादन.
  • मुंबईत आल्यानंतर नोकरीसोबत ICWA चा अभ्यास सुरू केला; मात्र आर्थिक परिस्थितीमुळे तो पूर्ण करता आला नाही. तरीपण शिक्षणाची जिद्द कायम ठेवत १९८२ मध्ये नोकरी करत असताना पुणे विद्यापीठातून एम.कॉम. पदव्युत्तर पदवी संपादन.

व्यावसायिक कारकीर्द

आर.सी.एफ. (RCF Ltd.)

  • पदवीधर झाल्यानंतर मुंबईत आगमन; अवघ्या सहा महिन्यांत आजरा अर्बन बँकेच्या मुंबई शाखेत नोकरी. त्यानंतर फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) मध्ये सेवेस प्रारंभ.
  • १९७८ मध्ये युनिट स्वतंत्र होऊन राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCF) झाले.
  • १९९१ मध्ये ऑफिसर पदावर पहिले प्रमोशन; पुढे विविध विभागांत काम करण्याची संधी
  • एक्सपान्शन अकाउंट्‍स, सेंट्रल अकाउंट्स, टाइम ऑफिस, कॅश, एक्साईज, औद्योगिक उत्पादन व मार्केटिंग फायनान्स अशा विभागांत अनुभव.
  • SAP आधारित ऑनलाइन डिस्पॅच सिस्टीम सुरू करण्याची संधी व मार्केटिंग फायनान्सच्या निमित्ताने देशभरातील विविध शहरांत केमिकल प्रॉडक्ट सर्वेक्षणाचा अनुभव.
  • ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत ८ पदोन्नती घेत सिनियर फायनान्स मॅनेजर पदापर्यंत पोहचून २०१४ मध्ये निवृत्ती.
  • RCF कडून मिळालेले ज्ञान, अनुभव, मैत्री आणि आयुष्यभराच्या आठवणी हीच अमूल्य शिदोरी.
  • ‘पेद्रेवाडी ही जन्मभूमी आणि RCF ही कर्मभूमी’ हा अभिमानाचा जीवनप्रवास.
बाळासाहेब - कारकीर्द
🏆

पन्नास वर्षे समाजसेवेची

१ जून २०२६ रोजी श्री. बाळासाहेब शिंत्रे यांनी आपल्या आयुष्याची ७२ वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने त्यांच्या गेल्या पन्नास वर्षांच्या सामाजिक, संघटनात्मक आणि सार्वजनिक कार्याचा आढावा घेताना मन अभिमानाने आणि कृतज्ञतेने भरून येते.

माझे घर त्यांच्या गावातील घराजवळच असल्यामुळे बाळासाहेबांना अगदी जवळून पाहण्याची, त्यांच्या जीवनप्रवासाचा साक्षीदार होण्याची आणि त्यांच्या कार्याची वाटचाल अनुभवण्याची संधी मला लाभली. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, बाळासाहेबांचे कॉलेजमधील रूममेट असलेल्या जिवलग मित्राचे सुपुत्र श्री. अमोल नारायण शिंदे यांनी नुकतेच ‘जीवन तरंग’ हे पुस्तक वाचले. बाळासाहेबांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत केलेली शैक्षणिक वाटचाल आणि त्यानंतरचा त्यांचा सामाजिक व सार्वजनिक कार्याचा प्रवास पाहून ते प्रभावित झाले आणि त्यांना प्रेरणा मिळाली. याच भावनेतून श्री. बाळासाहेब शिंत्रे यांच्या कार्याचा परिचय करून देणारी वेबसाईट सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

आज, १५ ऑगस्ट २०२६ रोजी ही वेबसाईट प्रकाशित होत आहे. हा क्षण बाळासाहेबांच्या पन्नास वर्षांच्या समाजसेवेचा गौरव करणारा आणि त्यांच्या कार्याची नोंद पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणारा आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘जीवन तरंग’ या आत्मचरित्रातील नोंदी, त्यांनी स्वतः दिलेली माहिती तसेच त्यांच्या जीवनातील मला ज्ञात असलेल्या अनेक घटना यांच्या आधारे त्यांच्या पन्नास वर्षांच्या समाजसेवेचा हा शब्दरूपी गौरव करण्याचा माझा हा अल्पसा प्रयत्न आहे.

१९७५

मे १९७५ मध्ये साताऱ्यातील रयत शिक्षण संस्था संचलित 'धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स' या कॉलेजच्या पहिल्या बॅचमधून त्यांनी पदवी संपादन केली आणि नोकरीच्या निमित्ताने मुंबईत आगमन झाले.

गेल्या पाच दशकांत त्यांनी अनेक सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि संघटनात्मक संस्थांमध्ये अत्यंत जबाबदारीने काम केले. १९७५ साली प्रथमच १५ ऑगस्ट रोजी गावच्या ग्रामस्थ मंडळाच्या सभेला उपस्थित राहण्याचा योग आला. त्या सभेत त्यांची इरिगेशन स्कीम अंतर्गत हिशोब तपासणीस पदावर निवड झाली. या क्षणापासून वयाच्या २१ व्या वर्षी त्यांच्या समाजकार्याच्या प्रवासाची खरी सुरुवात झाली.

१९७७

१९७७ साली राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आर.सी.एफ.) या भारत सरकारच्या नामांकित सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात बाळासाहेबांना नोकरीची संधी मिळाली. नोकरीसोबतच त्यांनी आर.सी.एफ. मध्ये सामाजिक व संघटनात्मक कार्यातही मोठे योगदान दिले. आर.सी.एफ. रुरल स्पोर्ट क्लबमध्ये खजिनदार, आर.सी.एफ. ऑफिसर्स असोसिएशनच्या सेंट्रल कमिटीमध्ये खजिनदार म्हणून त्यांनी अत्यंत जबाबदारीने काम पाहिले. तसेच निवृत्त झाल्यानंतर आर.सी.एफ. एक्स एम्प्लॉईज सोशल फोरममध्ये व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काही वर्ष काम पाहिले आणि सध्या ते सदर फोरममध्ये सक्रिय कमिटी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

१९८२

मे १९८२ मध्ये गावातल्या माझ्याच वर्गातील रंजना ढवळे यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि डोंबिवली मध्ये त्यांचा नवीन संसार सुरू झाला. त्यांना हर्षदा व मिलिंद अशा दोन गुणी मुलांचा लाभ झाला. सध्या त्यांची दोन्ही मुले इंजिनीयरची पदवी घेऊन परदेशी वास्तव्य करत आहेत.

१९८४

१९८४ मध्ये वाशी येथे वास्तव्यास आल्यानंतर सी-२ टाईप अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनच्या स्थापनेपासून श्री.बाळासाहेब सक्रिय राहिले.

सुरुवातीला खजिनदार व नंतर तब्बल पस्तीस वर्षे कोणत्या ना कोणत्या पदावर राहून सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी असोसिएशनची सेवा केली. सदर असोसिएशन यांच्या अध्यक्षतेखाली शुभम को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी मध्ये परिवर्तित करून त्यांनी पुनर्विकास प्रकल्पासाठी मॅनेजिंग कमिटी आणि रिडेव्हलपमेंट कमिटीसोबत गेली चार वर्षे सातत्याने प्रयत्न केले. त्याचे फलित म्हणून नुकतीच या २१ वर्षे रखडलेल्या भव्य प्रकल्पाला नवी मुंबई महानगरपालिकेकडून प्रकल्प बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र (CC) प्राप्त झाले आहे व हा प्रकल्प विकासकाच्या हस्ते लवकरात लवकर पूर्णतेस नेऊन सर्व सभासदांना टॉवर मधील नव्या अद्यावत घरकुलात सुखाने राहता यावे यासाठी प्रयत्नशील आहेत.

१९८५

१९८५ साली ‘वैदिक विश्व’ या पब्लिक ट्रस्टच्या माध्यमातून वाशी सेक्टर १५ येथे उभारण्यात आलेल्या वास्तूमध्येही त्यांनी स्थापनेपासून सक्रिय सहभाग घेतला. गेल्या पंचवीस वर्षे खजिनदार म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहेत. आज ही वास्तू ‘योगा कम कम्युनिटी सेंटर’ म्हणून प्रसिद्ध आहे.

१९९३

१९९३ साली ‘कोल्हापूर जिल्हा उत्कर्ष संघ, नवी मुंबई’ या संस्थेच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून कोल्हापूरवासीयांना एकत्र आणण्याचे कार्य त्यांनी केले.

१९९५

हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि माननीय श्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या पत्नी सौ रंजना बाळासाहेब शिंत्रे तीस वर्षे शिवसेनेसी एकनिष्ठ राहून नवी मुंबईमध्ये प्रत्येक कार्यक्रमांमध्ये पुढाकाराने भूमिका बजावत आलेली आहे. समाजातील प्रत्येक घटकाशी जपलेला स्नेह आणि विश्वास याच बळावर सौ. रंजना शिंत्रे यांनी १९९५ साली नवी मुंबई महानगरपालिकेत प्रथम नगरसेविका म्हणून निवडून यायचा मान पटकावला आणि त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. पुढे शिक्षण, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. गेली अठरा वर्षे त्या 'शिवसेना नवी मुंबई जिल्हा संघटक' म्हणजेच महिला आघाडीच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

१९९७

१९९७ साली ग्रामदैवत श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सुमारे १४ लाख रुपयांचा निधी लोकसहभागातून उभारण्यात आला. त्या समितीचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली.

१९९७

सौ. रंजना शिंत्रे यांच्या पुढाकारातून १९९७ साली ‘हिरण्यकेशी शिक्षण प्रसारक मंडळ’ या संस्थेच्या माध्यमातून सरंबळवाडी ता. आजरा जि. कोल्हापूर येथे हायस्कूल सुरू करण्यासाठी मान्यता मिळवली. शासनाकडून दोन एकर जागा मिळवून स्थानिक संचालकांच्या व ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेची भव्य इमारत उभारण्यात आली. त्यामुळे चार ते पाच किलोमीटर अंतरावरून नाला-ओढ्यातून शिक्षण घेण्यासाठी मुलांना यावे लागत होते. विशेष करून मुली शिक्षणापासून वंचित राहत होत्या. या हायस्कूलमुळे गरीब व शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींना शिक्षणाची फार मोठी सुविधा झाली. गेल्या २८ वर्षांपासून कै. शंकरराव उत्तुरे हायस्कूल अत्यंत यशस्वीपणे कार्यरत असून संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. रंजना शिंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या या हायस्कूलमध्ये एस.एस.सी. परीक्षेचा निकाल दरवर्षी शंभर टक्के लागण्याची गौरवास्पद परंपरा कायम आहे.

१९९८

१९९८ साली 'पेद्रेवाडी ग्रामस्थ मंडळ' संचलित ‘श्रम साफल्य सहकारी पतसंस्था’ या नियोजीत संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा बाळासाहेबांनी स्वीकारली. ग्रामस्थ मंडळ आणि पतसंस्थेचे अधिकृत रजिस्ट्रेशन करून 'संस्थापक अध्यक्ष' म्हणून सलग पंधरा वर्षे संस्थेचा कार्यभार प्रभावीपणे सांभाळला. त्यावेळी मला काही ग्रामस्थ त्यांचा उजवा हात म्हणायचे. त्यांनी माझे वडील श्री शशिकांत चव्हाण यांना सामाजिक क्षेत्रातील गुरु मानलेले आहे. त्याचप्रमाणे मी त्यांचा आदर्श घेऊन सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. त्यांची पत्नी सौ रंजना शिंत्रे या या शिवसेनेमध्ये सुरुवातीपासून सक्रिय आहेत, तरी गावच्या सामाजिक कार्यामध्ये त्यांनी कधीच राजकारण येऊ दिले नाही, म्हणूनच आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांच्या नेहमी पाठीशी राहिलो. २००३ साली अध्यक्ष असताना श्रम साफल्य पतसंस्थेसाठी बी.डी.डी. चाळीत स्वतंत्र खोली खरेदी करण्यात आली. आज त्या जागेच्या अर्ध्या भागातून संस्थेला नियमित भाडे उत्पन्न मिळत असून उर्वरित भागात संस्थेचे कामकाज सुरू आहे. या दूरदृष्टीपूर्ण निर्णयामागे बाळासाहेबांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारे श्री लक्ष्मण गाडे , कै. गोविंद चव्हाण आणि इतर सदस्य यांचा फार मोठा वाटा आहे. सदर संस्थेमध्ये आजही कार्याध्यक्ष म्हणून संस्थेच्या प्रगतीसाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.

२०००

नगरसेविका झाल्यानंतर सौ रंजना शिंत्रे यांच्या सहकार्याने आमच्या तालुक्याची आजरा बँक नवी मुंबईमध्ये आणण्याबद्दल या उभयतांनी मनात आणलं आणि त्या अनुषंगाने बँकेचे सर्वेसर्वा कै. काशिनाथ चराटी आण्णा आणि कै. माधवराव देशपांडे यांच्याशी संपर्क साधून २००० मध्ये आजरा बँकेची कोपरखैरणे नवी मुंबई येथे शाखा उघडण्यात त्यांना यश आले.

२००९

२००९ साली ‘राजर्षी शाहू कोल्हापूर विकास प्रतिष्ठान’ या पब्लिक ट्रस्टच्या माध्यमातून तत्कालीन मंत्री मा. श्री. विनयजी कोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी पार्क, दादर येथे कोल्हापूरवासीयांसाठी “न भूतो न भविष्यती” असा भव्य ‘कोल्हापूर भवन’ उभारण्याच्या उद्देशाने तीन लाख कोल्हापूरवासीयांचा ऐतिहासिक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या भव्य उपक्रमात खारीचा वाटा उचलत ‘नवी मुंबई शहर प्रमुख’ म्हणून नवी मुंबईतून तब्बल ३५ बसेस भरून कोल्हापूरकरांना मेळाव्यासाठी घेऊन जाण्याचे यश मिळाले.

२०१४

गावाच्या दक्षिणेला डोंगरात असणाऱ्या काळम्मा देवी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सुमारे २० लाख रुपयांचा निधी लोकसहभागातून उभारण्यात आला. या उपक्रमातही सक्रिय योगदान देत मंदिराच्या पुनर्बांधणीच्या कार्यात सहभाग नोंदवला.

२०१७

श्री. बाळासाहेब शिंत्रे यांच्या निवृत्तीनंतर त्यांनाही शिवसेनेच्या प्रमुख प्रवाहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. २०१७ साली अकोला (प) विधानसभा संपर्कप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तेव्हापासून ते संघटनात्मक बांधणीसाठी सातत्याने कार्यरत आहेत.

आज १५ ऑगस्ट २०२६ रोजी, स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून त्यांनी प्रसारित केलेल्या या संकेतस्थळाला माझ्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! हे संकेतस्थळ त्यांच्या कार्याची, विचारांची आणि जीवनप्रवासाची प्रेरणादायी ओळख सर्वांपर्यंत पोहोचवो, हीच सदिच्छा.

🤝 आयुष्यात लाभलेली "चौकडी" - अनोखे योगायोग

माझ्या आयुष्याच्या प्रवासात बालपणापासून आजपर्यंत अनेक टप्पे आले—बालपण, शालेय ते महाविद्यालयीन शिक्षण, नोकरी, कौटुंबिक जीवन, तसेच सी२-७ बिल्डिंग, वाशी, न्यू कृष्णा टॉवर, कोपरखैरणे, पेद्रेवाडी ग्रामस्थ मंडळ, कोल्हापूर जिल्हा उत्कर्ष संघ अशा विविध सामाजिक संस्थांमधील कार्य आणि राजकीय क्षेत्रातील सहभाग. या प्रत्येक टप्प्यावर मैत्रीच्या वेगवेगळ्या चौकड्या निर्माण होत गेल्या आणि प्रत्येक चौकडीने मला मैत्री, विश्वास, परस्पर सहकार्य, जिव्हाळा व निस्वार्थ नात्यांचे अमूल्य धडे दिले. या सर्वांपैकी काही निवडक चौकडींचा येथे उल्लेख करताना मी स्वतःला खरोखर भाग्यवान आणि धन्य समजतो. आज मागे वळून पाहताना प्रकर्षाने जाणवते की, माझ्या आयुष्यातील अनेक यश, आनंदाचे क्षण आणि जीवनाला लाभलेली समृद्धी यामागे या सर्व चौकड्यांचे मोलाचे योगदान आहे.

मी प्राथमिक शाळेत सातवीत शिकत असताना आमच्या वर्गात अवघे चारच विद्यार्थी होतो. योगायोगाने मी, श्याम पंडीत, आण्णा निकम आणि मारुती कातकर असे आम्ही चौघेही अभ्यासात हुशार होतो. त्या वर्षी आमच्या शाळेच्या इतिहासात प्रथमच सातवीचा शंभर टक्के निकाल लागला. त्या काळातील माझे जिवलग वर्गमित्र यांच्याशी आजही ऋणानुबंध कायम आहेत. श्याम डोंबिवली, आण्णा कांजूरमार्ग व मारुती गावी स्थायिक असले तरी प्रसंगानुरूप आम्ही एकत्र भेटतो आणि कायम संपर्कात असतो.

सातवीची पहिली चौकडी आणि परीट गुरुजी

सातवीच्या वर्गात लाभलेली पहिली चौकडी आणि वर्गशिक्षक परीट गुरुजी

सन १९७१ मध्ये सातारा येथील डॉ. डी. जी. कॉलेज ऑफ कॉमर्समधील चार वर्षांच्या शिक्षणकाळात निवास जाधव, नारायण शिंदे आणि भगवान शेडगे हे माझे रूममेट्स होते. त्या काळात आम्ही एकत्र राहताना एकमेकांचे सुख-दुःख वाटून घेतले, संघर्षमय परिस्थितीत परस्परांना आधार दिला आणि जिवाभावाची मैत्री जोपासली.

आज निवास आणि भगवान सातारा जिल्ह्यात, तर नारायण सांगली जिल्ह्यात वास्तव्यास असले तरी, एकमेकांच्या सुख-दुःखात, कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये आवर्जून सहभागी असतो. काळ, अंतर आणि परिस्थिती बदलली, तरी आमच्या मैत्रीतील जिव्हाळा, विश्वास आणि आपुलकी आजही तितकीच दृढ आहे. अशा निरपेक्ष, जिवाभावाच्या आणि आयुष्यभर साथ देणाऱ्या मैत्रीचा मला मनापासून अभिमान वाटतो.

माझ्या 'जीवन तरंग' या आत्मचरित्रात लेबर स्कीम अंतर्गत शिक्षण घेत असताना केलेल्या संघर्षाचे आणि त्या दिवसांच्या आठवणींचे सविस्तर वर्णन केले आहे. या मैत्रीला एक सुंदर योगायोगाची जोडही लाभली. निवास जाधव याचे चिरंजीव स्वप्निल याने 'जीवन तरंग' या पुस्तकाची छपाई केली, तर नारायण शिंदे याचे चिरंजीव अमोल याने या पुस्तकाची वेबसाईट तयार केली. मित्रांच्या पुढच्या पिढ्यांनी माझ्या आयुष्याच्या या महत्त्वाच्या कार्यात दिलेले योगदान म्हणजे खऱ्या अर्थाने दुग्धशर्करा योग आहे.

महाविद्यालयीन चौकडी – शिक्षण आणि लेबर स्कीमच्या काळातील भक्कम साथ: जीवनाचा अविस्मरणीय अध्याय.

महाविद्यालयीन चौकडी – शिक्षण आणि लेबर स्कीमच्या काळातील भक्कम साथ: जीवनाचा अविस्मरणीय अध्याय.

माझा मित्र निवास जाधव याने त्याच्या 'बेस्ट इयर्स ऑफ लाईफ' या मनोगतात आमच्या मैत्रीचे अत्यंत हृद्य शब्दांत वर्णन केले आहे. तो लिहितो की, "बाळू शिंत्रे, नारायण शिंदे, भगवान शेडगे आणि मी – आम्हा चौघांची जिवाभावाची मैत्री होती. कॉलेजला जाताना आम्ही शक्यतो नेहमी एकत्रच असायचो. आमच्या मैत्रीचा केंद्रबिंदू 'बाळू' होता. तो आमच्यापेक्षा अधिक चिकाटीने अभ्यास करायचा. मी हुशार असूनही अभ्यासाच्या बाबतीत थोडा उदासीन होतो. बाळू नेहमी मित्रांचे हित जपायचा. त्याचा प्रेमळ आणि सहकार्यशील स्वभाव आम्हा सर्वांना हवाहवासा वाटायचा. अभ्यासाबाबत तो आम्हाला सातत्याने मार्गदर्शन करायचा."

मित्राने व्यक्त केलेले हे शब्द माझ्यासाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा अधिक मोलाचे आहेत.

त्यानंतर १९७६ साली मी चेंबूर येथील एफ.सी.आय. (फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीत रुजू झालो. नोकरीच्या मुलाखतीसाठी रांगेत उभे असताना राजेंद्र जोशी आणि सुरेश ढाके यांच्याशी प्रथम परिचय झाला. योगायोगाने आम्हा तिघांचीही एकाच सेक्शनला नियुक्ती झाली. पुढे एफ.सी.आय.मधून आर.सी.एफ. स्वतंत्र कंपनी म्हणून स्थापन झाल्यानंतर श्रीकांत भावे आमच्या समूहात सहभागी झाला आणि आमच्या आणखी एका चौकडीचा जन्म झाला. परस्परांचा विश्वास, सहकार्य, जिव्हाळा आणि निस्वार्थ मैत्री यामुळे आमचे नाते अधिकाधिक दृढ होत गेले. आमच्या या चौकडीच्या मैत्रीची चर्चा आजही आदराने आणि कौतुकाने केली जाते.

नोकरीतील चौकडी – मैत्रीची शिदोरी  - १९७७ पासूनच्या आर.सी.एफ. प्रवासातील सहकार्य व सुखदुःखात साथ

नोकरीतील चौकडी – मैत्रीची शिदोरी - १९७७ पासूनच्या आर.सी.एफ. प्रवासातील सहकार्य व सुखदुःखात साथ

निवृत्तीनंतर या चौकडीत समविचारी अशा दोन चौकड्या सामील होऊन 'एव्हरग्रीन ग्रुप' आकाराला आला. या ग्रुपच्या वर्षातून बऱ्याच पिकनिक आणि गेट-टुगेदर होतात, त्यामुळे हा केवळ म्हातार्‍यांचा समूह नसून, उत्साह, जिव्हाळा, परस्पर सहकार्य आणि समाजाभिमुख कार्याच्या प्रेरणेने सदैव तरुण राहणाऱ्या आणि सतत संपर्कात असणाऱ्या 'महा-ताऱ्यांचा' परिवार आहे. आमच्यासाठी RCF म्हणजे "Real Close Family" या शब्दांचा खरा अर्थ या ग्रुपमुळे अनुभवायला मिळतो.

सन १९८२ मध्ये माझा सौ. रंजना हिच्याशी विवाह झाला. काही वर्षांतच आमच्या संसारवेलीवर 'हर्षदा' आणि 'मिलिंद' ही दोन सुंदर फुले उमलली आणि आमच्या कुटुंबाचा चौकोन पूर्ण झाला. त्या क्षणापासून आमच्या संसाराला खऱ्या अर्थाने सुख, समाधान आणि समृद्धीची पालवी फुटली.

कुटुंबाची चौकडी – कुटुंब चौकडी – प्रेम, विश्वास आणि आनंदाचा प्रवास

कुटुंबाची चौकडी – कुटुंब चौकडी – प्रेम, विश्वास आणि आनंदाचा प्रवास

आमची दोन्ही मुले उच्चशिक्षित, सुसंस्कृत, संवेदनशील आणि कुटुंबवत्सल आहेत. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि संस्कारांनी आमचे जीवन अधिक समृद्ध केले आहे. त्यांच्या प्रगतीचा आणि गुणांचा आम्हाला मनापासून अभिमान वाटतो. मुलगी हर्षदाचा विवाह होऊन ती सासरी गेल्यानंतर काही वर्षांतच मुलगा मिलिंदचा विवाह रसिका सरंबळे हिच्याशी झाला आणि आमच्या कुटुंबाचा चौकोन पुन्हा एकदा पूर्ण झाला. रसिका उच्चशिक्षित, शिस्तप्रिय, व्यवहारी आणि उत्तम सुगरण असल्याने तिने आपल्या प्रेमळ स्वभावाने अल्पावधीतच संपूर्ण कुटुंबाची मने जिंकली. ईश्वराने आम्हाला जे हवे होते, ते भरभरून दिले, याची आम्हाला मनापासून जाणीव आहे. माझ्या या घरच्या चौकडीने माझ्या जीवनाला नवा अर्थ, नवी दिशा आणि जगण्याचे खरे सार दिले. त्यामुळे आज मागे वळून पाहताना मन कृतज्ञतेने आणि समाधानाने भरून येते.

याच परंपरेचा पुढचा अध्याय २०२२ मध्ये सुरू झाला. सी-२ टाईप अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनच्या १६० सभासदांच्या संस्थेची जबाबदारी आमच्यावर आली. श्री. श्रीकांत पोलेकर (सचिव), श्री. आनंद कागले (खजिनदार), ॲड. अर्जुन पाटील (कायदेशीर सल्लागार) आणि मी अध्यक्ष या चौकडीच्या अंतर्गत एकदिलाने संस्थेचे कामकाज सांभाळू लागलो. या प्रवासात आमच्यातील विश्वास, समन्वय आणि जिव्हाळा अधिक दृढ होत गेला. पुढे या संस्थेचे शुभम को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये रूपांतर झाल्यानंतरही आम्ही त्याच समर्पणाने काम करत आहोत.

२१ वर्षांच्या प्रतीक्षेला गती देणारी ‘चौकडी’ — शुभम सीएचएस, वाशी पुनर्विकास प्रकल्प.

२१ वर्षांच्या प्रतीक्षेला गती देणारी ‘चौकडी’ — शुभम सीएचएस, वाशी पुनर्विकास प्रकल्प.

विशेष म्हणजे, व्यवस्थापन समिती आणि पुनर्विकास समितीच्या सर्व सदस्यांच्या सक्रिय सहकार्यामुळे तब्बल २१ वर्षे रखडलेला पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यात आम्हाला यश मिळाले. हा केवळ प्रशासकीय यशाचा टप्पा नसून, सामूहिक प्रयत्न, परस्पर विश्वास आणि एकजुटीच्या बळावर अशक्य वाटणारी गोष्टही शक्य होते, याचा तो जिवंत पुरावा आहे. माझ्या आयुष्यातील ही एक अत्यंत महत्त्वाची, समाधानकारक आणि अभिमानास्पद उपलब्धी आहे.

आज या सर्व चौकड्यांचा मागोवा घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते—आयुष्यातील खरी श्रीमंती ही संपत्ती, पद किंवा प्रतिष्ठेत नसून आयुष्यभर जपलेल्या जिवाभावाच्या माणसांमध्ये असते. मला लाभलेल्या प्रत्येक चौकडीने माझे आयुष्य अधिक समृद्ध, अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी बनवले.

माझ्या जीवनप्रवासात प्रत्येक टप्प्यावर खंबीर साथ देणाऱ्या माझ्या सहचारिणी, मा. नगरसेविका सौ. रंजना शिंत्रे, आमचे कुटुंब—मुलगा मिलिंद, सून रसिका, नातू रिधान, मुलगी हर्षदा, जावई सुदर्शन, नातवंडे नित्या व नैतिक, माझे ज्येष्ठ बंधू बाबू दादा आणि अर्जुन दादा तसेच शिंत्रे परिवारातील सर्व सदस्य,पेद्रेवाडी ग्रामस्थ, आरसीएफमधील सहकारी, विविध सामाजिक संस्थांतील पदाधिकारी व सदस्य, मित्रपरिवार आणि आप्तस्वकीय यांच्या प्रेम, सहकार्य आणि प्रेरणेमुळेच माझ्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण घडली.

या सर्वांच्या सहवासातून लाभलेले अनुभव, जपलेल्या आठवणी आणि मिळालेले संस्कार यांनाच मी 'जीवन तरंग' या आत्मचरित्रात शब्दरूप देण्याचा प्रयत्न केला आहे. या निमित्ताने माझ्यावर प्रेम करणाऱ्या अनेक व्यक्तींच्या सहकार्यामुळे आणि मार्गदर्शनामुळे माझ्या जीवनाला आकार मिळाला.

त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी लाभली, हे माझे परमभाग्य समजतो. अशा व्यक्तींच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी परमेश्वराने मला दिली, त्याबद्दल मी परमेश्वर चरणी विनम्रपूर्वक नतमस्तक होतो.

— बाळासाहेब वाकोजी शिंत्रे